Monday, January 27, 2020

३ बैल, एक अंगावर येणारा अनुभव...



बैल, एक अंगावर येणारा अनुभव...

डॉ. शंतनू अभ्यंकर

...ते अमिताभ चं जाऊ दे, मी काय सांगत होतो, लोकरंगमंच! नेमकं ‘लोकरंगमंच’ याच नावाच्या सातारच्या संस्थेचं   ‘बैल अ-बोलबाला’ नावाचं नाटक नुकतंच पाहिलं मी. हे नाटक म्हणजे कोणतीही  किस्सेवजा कहाणी नाही. विचारांना ढुश्या  देणारे हे नाटक आहे. चक्क रवंथ करत बसावं असं आहे.
बैल विषयक मराठीतील उत्तमोत्तम कविता इथे लयदार  भाषेत, गात, नाचत, वाजत-गाजत सादर होतात. एक शेतकऱ्याबरोबरच लहानाचा मोठा झालेला बैल, आता   कसायाला विकायला काढलाय. बैलाचा आणि मालकाचा हा आदल्या रात्रीतला संवाद.
पार सिंधु संस्कृतीच्या शिक्कयावरील बैलापासून सुरू झालेला माणसाचा आणि बैलांचा प्रवास, दोघेही एकमेकांवर अप्पलपोटेपणाचे आरोप करतात, स्वतःची बाजू हिरीरीने मांडतात, भांडतात, रडतात. शेतकऱ्याचं आणि बैलाचं  सजीव, ओलं नातं पाहून/ऐकून आपलेही डोळे पाणावतात आणि अखेर  बैलाची ‘कत्तल’ ऐकून आपण हबकून जातो.
आपल्या बापजाद्यांनी बैल पाळला तो गरज म्हणून. हा पशू माणसाळवल्यावर मग त्याच्याबद्दलच्या भावभावना, ऐश्वर्याच्या, पतप्रतिष्ठेच्या कल्पना, मूल्यव्यवस्था आल्या. नव्या जमान्यात ह्या साऱ्या लयास जात आहेत. असल्या नाटकाची  स्मरणरंजनपर  विलापिका होण्यास असा कितीसा वेळ लागणार? पण हा बैल तसा नाही. आपल्या प्राक्तनाला घट्टमुट्टपणे सामोरे  जाणारा, पण त्याच वेळी आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा दस्तावेज, रोखठोकपणे,  मांडणारा  हा बैल आहे. अर्थात प्रेक्षागृहात  बैलाच्या सुखदुखाशी समरस होणारे, बाहेर येताच फुकट दिला तरी बैल  पाळणार नाहीत हे निश्चित.
पण लोकांनी बैल पाळवा असला वृषभ/गो-पूजक संदेश देणारं हे नाटक नव्हे.  हे नाटक, कधी  आपल्यातला बैल तर कधी बैलातला माणूस, आपल्याला आलटून पालटून दाखवून देते. बैलही कधी मायाळू, कधी माजोर्डा, कधी मानी तर  कधी मुका बिचारा असा मानवी असतो.  आपणही कधी कधी बैलोबा असतो, कधी कधी शुद्ध  नंदीबैल असतो, घाण्याचे बैल असतो, गावावरून ओवाळून टाकलेले वळू असतो. आपणही कोणाकडून तरी  पाळले गेलेलो असतो आणि आपल्याही झुलीखाली चाबकाचे वळ असतात.
भारदस्त कवींच्या ह्या कविता. त्यामुळे जबरदस्त शब्द, हेच ह्या नाटकाचे सर्वात मोठे बलस्थान.  यातले कित्येक शब्द म्या पामराला अपरिचित. मी तरी बरा  म्हणायचा. खेड्यात लहानाचा मोठा झालो आणि आज  माझी प्रॅक्टिस  खेड्यातच आहे.  पण पुण्यामुंबईच्या डॉट कॉम पिढीला हे फारच  परकं वाटणार हे निश्चित...................
सॉरी हं. लिखाणात जरा खंड पडला. झालं असं की आत्ताच एक मुलगा आईला पायाला लागल्याचं सांगत आला आणि मी मधूनच उठून पेशंट तपासायला गेलो. काय झालं विचारल्यावर तो म्हणतो कसं, ‘आओ डॉगदर, आमी जत्रंला गेल्तो, पण अचानक अ  बुलक् केम ऑन आवर बॉडी!!!’ पाहीलंत, असा हा बैल, इट कम्स अचानक ऑन आवर बॉडी. अचानक तो जाणीव करून देतो, आपलं जिणं, आपलं रहाणं, आपलं खाणं, आपलं बोलणं सगळं सगळं बदलतंय. नीट बसत नाही म्हणून चार्जर  काढून दुसऱ्या प्लगला लावावा तशा सहजतेने  खेड्यापाड्यातल्या लोकांनी पोरांची नाळ इंग्रजीच्या प्लगला जोडली आहे. तेंव्हा बैलाचा बुलक् आणि शेणाचं बुलशिट झालेलंच आहे. बैल आता जाणारच  आहे, नंतर झोपा करून उपयोग नाहीच्चे, तेंव्हा तेवढे कष्ट तरी घ्यायचे का नाही एवढंच आता ठरवायचं आहे. 




४ मायमराठी का my मराठी


आयुष्यावर बोलू काही

मायमराठी का my मराठी


हां तर मी काय सांगत होतो... आपलं जिणं, रहाणं, खाणं सगळं सगळं बदललं आहे.
एका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या, अॅन्युअल डे फंक्शनला, मी परवा चीफ गेस्ट होतो! खर तर चीप गेस्ट होतो. माझ्या इतका सस्त्यातला गेस्ट दुसरा मिळणे दुरापास्त होते. स्वतःच्या खर्चाने शाळेत जाऊन, स्नेहसंमेलन सहन करून, वर देणगी देणारा असा विरळाच. शिवाय चिल्यापिल्यांची दंगामस्ती पहात आणि ऐकत मी भाषणही ठोकले. ते तब्बल साडेतीन मिनटांच्यावर मलाही सोसवेना आणि चिमुकल्या श्रोत्यांनाही. पण त्या दोन तीन तासात  मी तिथे जी भाषा ऐकली, ती थक्क करणारी होती.
घरीदारी मराठी बोलणाऱ्या, घरीदारी मराठी चालणाऱ्या, घरीदारी मराठी वागणाऱ्या त्या चिमुरड्यांचे शिक्षण मात्र इंग्रजीतून चाल होते. भाषा इंग्रजी आणि संस्कृती मराठी अशी रस्सीखेच चालली होती. चांगलीच कुतरओढ होत होती सगळ्यांची. पहाणाऱ्याला मौजेची वाटत असली तरी प्रकार अंतर्मुख करणारा होता.
गॅदरिंग संपताच सगळी किलबिल सरली होती.  प्रिन्सिपॉल बाईंच्या केबिनमध्ये ‘च्यामारी’च्या साथीनं (चहा आणि मारी बिस्किट) चर्चा रंगली होती. संतवचनांनी, संतमहंतांच्या तसबीरींनी आणि पुतळ्यांनी बाईंभोवती प्रभावळ धरली होती. मधूनच शाळेत आया म्हणून काम करणाऱ्या सुलामावशी कुठे आहे असा प्रश्न विचारायची वेळ त्या माउलीवर ओढवली. शाळेत इंग्लिश आणि फक्त इंग्लिशमधेच बोलायचे असा फतवा होता. मग काय थेट सवाल आला, ‘व्हेअर आर सुलामावशी?’ आदरार्थी बहुवचनाने आता लुगड्यातून झग्यात प्रवेश केला होता.  आणि तत्पर  उत्तरही आले, ‘सुलामावशी आर डाऊन!’
सगळे शिक्षणतज्ञ वगैरे वगैरे सांगतात, की मातृभाषेतून शिक्षण हेच योग्य. पण माझ्यासकट अख्ख्या होल महाराष्ट्रात हे फारसं कुणीच मनावर घेतलेलं दिसत नाही. मुलांना लहानात लहान वयात इंग्लिश मिडीयममधे घालायची अगदी चढाओढ सुरु आहे.
पोरही जरा येस-फेस करू लागली की मऱ्हाठी संस्कृतीला आणि घरच्या मऱ्हाठी भाषकांना फालतू समजू लागतात; आणि अशा पोरांचं कौतुकही  वाटतं मायबापाला.  प्रश्न हा आहे. उत्तम इंग्लिश येण आज जीवनावश्यक आहे. पण म्हणून उत्तम मराठी येणं आणि बोलणं  हे कमअस्सल कसं?
मला तर लो. टिळक, शिवाजी महाराज वगैरे मंडळी इतर भाषेत बोलायला लागली की अस्वस्थ वाटतं. टिळक कुठल्याशा मालीकेत हिंदीत बोलत होते.  स्वराज्य हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असून तो ते मिळवणारच  असल्याचं, त्यांनी हिंदीत सांगितल्यामुळे मला बराच वेळ ते पटेचना. ‘अर्रे!, ये अपना आदमी हिंदीमे कैसे बोल्नेकू लग्या?’, असा प्रश्न मला पडला होता. देवबीव मंडळीसुद्धा माझ्या लहानपणी उत्तम  मराठी बोलत पण मी इंग्लिश मिडीयममधे गेल्यावर तीही इंग्लिशमधे बोलायला लागली! Curse, Penance, Wishes हे शब्द अमर चित्र कथांतून माझ्या शब्दसंपदेत जमा झाले.
फार काही बिघडलं असं माझं म्हणणं नाही. संस्कृती आणि भाषा ह्या  प्रवाही असतात. ‘पसायदान कोणत्या भाषेत आहे?’, असं विचारल्यावर, ‘संस्कृत!’ असं उत्तर देणारी मुले आहेत. त्यांचं काही चूक नाही. त्यांच्या कानावर पडलेल्या मराठीचा आणि पसायदानातल्या मराठीचा संबंध नाही एवढाच याचा अर्थ. पण पसायदान परके वाटायला ४०० वर्ष जावी लागली. पुलं परके व्हायला अजून ४०च पुरतील आणि कदाचित वीसच वर्षानंतर, ह्या सदरातील लिखाण मराठीत होतं बरं, असं सांगावं लागेल.
संस्कृतीचा आणि भाषेचा हा बदलांचा झपाटा छाती दडपून टाकणारा  आहे, एवढंच.
सकाळ सातारा २६/१/२०२०



Wednesday, January 15, 2020

२ आयुष्यावर बोलू काही अॅंग्री यंग मेन


२ आयुष्यावर बोलू काही
अॅंग्री यंग मेन
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

...ते असो, मी काय सांगत होतो... यक्षगान; यक्षगान  हा पारंपारिक प्रकार.  रात्रीच्या वेळी सगळी  झाकपाक झाल्यानंतर देवळाच्या आवारात, समयांच्या आणि टेंभ्यांच्या ढणढणत्या प्रकाशात होणारा खेळ. सुष्टादुष्टाची लढाई हा ठरलेला कथामेळ.    रात्रीची वेळ; तो नाचरा,  पिवळा उजेड, त्याच्या लवलवणाऱ्या जीभा आणि देवळाच्या कोनाड्यात, भिंतींवर, कमानीवर, ओवरीवर, पारावर, पिंपळावर  पडणाऱ्या त्या पात्रांच्या भल्यामोठ्या सावल्या!! सगळा अनुभव किती जिवंत होत असेल.  
कथा सहसा रामायण, महाभारत, पुराणातली. सगळी पात्र दैवी किंवा दानवी. मानवी फार क्वचित. त्यामुळे पेहराव आणि आव सगळा  अमानवी.  कल्पनाशक्तीला भरपूर वाव. लाल, हिरवे, पिवळे, निळे असे गडद रंगाचे कपडे, त्याला अगदी चकचक चकाकणारी जर. मेकअप सुद्धा भडक. विशेषतः राक्षस पार्ट्यांचे. भुवया म्हणजे बोटभर जाड सुरवंट आणि कोणाही राक्षसाला  मिसरूड वगैरे भानगड नाही डायरेक्ट आकडेबाज मिशाच.  मोठी मोठी शिरोभूषणे, दणकट आभूषणे, लांबच लांब केशकलाप  असा सगळा मामला. अभिनयही तसाच.  राग, क्रौर्य, हास्य, बीभत्स असे  ठसठशीत रस. तमाशात  असते तशी प्रत्येक संवादाला तालाची थाप. संवाद आणि पदं घोळवून घोळवून  म्हणायची पद्धत आणि बहुतेकदा मागे झिलकऱ्यांची साथ. संवाद सगळे खड्या आवाजात. इथे कट कारस्थानं सुद्धा तारस्वरात शिजणार आणि प्रेमळ कुजबूज मुळी कुणाचीही बूज राखणार नाही.  
पण करणार काय? इलाजच नाही.  शेवटी समईच्या उजेडात लांबवरच्या प्रेक्षकांच्या नजरेस पडायचं, त्यांच्या कानी पडायचं  आणि मनीचे भाव त्यांच्यापर्यंत पोचवायचे, तर हे सगळं असंच उत्क्रांत झालं  असणार, नाही का?
तंत्रज्ञानाने कलाविष्कारही किती बदलले. लांबवर ऐकू जाणे, झगझगीत उजेड असणं आणि सिनेमाच्या तंत्रामुळे अगदी गालावरचा तीळही दृगोचर   होणं शक्य झालं. मगच  संयत अभिनय, अस्फुट संवाद आणि वास्तववादी रंगरंगोटी शक्य झाली. वास्तववादी कथाही शक्य  झाली. पूर्वी कोणा सामान्य बाया-बापड्याच्या दु:खाचा हळवा कोपरा मंचित  होणं शक्यच नव्हतं. महानायक आणि महाखलनायकांचीच रंगभूमी ती. 
 पण कथा आणि पात्र पौराणिक असली, सादरीकरण पारंपरिक असलं,  तरी हे असले लोकखेळ तितकेच समकालीन असतात. यात  आजच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवर कधी आडून तर कधी उघड कोट्या असतात. यातील नारद, सूत्रधार, दारुड्या, शिपाई असली पात्र, हमखास हशे आणि टाळ्या वसूल करतात ते उगीच नाही. मग स्वर्गारोहणाच्या शीनमधे  पांडवांना  स्वर्गाच्या दारावर लाचखोर शिपाई भेटतात आणि देवाधिदेव इंद्र अहिल्येच्या कुटीबाहेर येताच, त्याचा सारथी त्याला  दम  देतो, ‘माझ्या मेव्हण्याला तुमच्या हापिसात  लावून घेताय, का ठोकू बोंब?’ 
आपल्या तमाशातला सोंगाड्या किंवा ‘मावशी’ तरी वेगळं काय करतात? गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विनोद आणि महाराज, कृष्ण वगैरे पात्रांची आजिबात पत्रास न ठेवता त्यांना अद्वातद्वा  बोलणे हे यांचे मुख्य काम. ‘मावशी’ तर श्रीकृष्णाला ओळखत सुद्धा नाही. ‘आमची वाट आडीवणारा  हयो  रे कोण मुडद्या?’; असं ती पेंदयाला विचारते. तमाशातला सोंगाड्या साक्षात महाराजांना उलटून बोलतो, त्यांच्यावर ग्राम्य विनोद करतो, त्यांची एकही आज्ञा पाळत नाही, त्यांची पार फजिती करून सोडतो. राजाधिराजांची ही ऐशी परवड प्रेक्षकांना सुखावून जाते. प्रस्थापितांबद्दलचा सगळा  राग, सगळी भडास परस्पर निघून जाते. सामन्यांच्या बाजूने व्यवस्थेशी दोन हात करणारे, हे तर आद्य ‘अॅंग्री यंग मेन’. बाकी अमिताभ वगैरे अगदी आत्ता आत्ता आले हो!!!
   
प्रथम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२०
आयुष्यावर बोलू काही, लेखांक २
रविवार सकाळ (सातारा)


१ आयुष्यावर बोलू काही संसार सार


१ आयुष्यावर बोलू काही
संसार सार
डॉ. शंतनू अभ्यंकर

देवादिकांना मानवी रूप दिले की किती लोभस दिसतात ते. परवाच यक्षगानाचा कार्यक्रम होता. उत्सुकता म्हणून गेलो. यक्षगान म्हणजे कानडी रामलीला.  काय मस्त प्रकार होता तो.  भाषेचा अडसर मुळी जाणवलाच  नाही. बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आणि कथा ओळखीची. 
सीताहरणाची कथा. अगदी अथ:पासून इति:पर्यंत माहिती असलेली.  पण तरीदेखील अशा पद्धतीने सादर झाली की काळजाचा ठाव घेतला त्या कलाकृतीनी.  त्यातला लक्षात राहिला तो रावण!
नांदी आणि गणवंदना झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात आला की रावण! काय त्याची चाल; दाणदाण पावले टाकत, मोठ्या आवाजात गर्जना करत, हात असे दोन्हीकडे कमरेवर ठेवलेले,  ह्या एवढाल्या मिशा, मोठे मोठे डोळे गरागरा फिरवत तो आला आणि किंचाळायला लागला. म्हणाला ‘शूर्पणखेला घेऊन या, ती का आक्रंदन करते आहे,  ते मला पाहायचे आहे.’ आपल्या बहिणीबद्दलची तळमळ अचानक त्याच्या चेहऱ्यावर उमटली.  अभिनय खरंच देखणा होता या रावणाचा. शूर्पणखेची अवस्था पाहून विव्हल झालेला रावण. मायावी मारीचाला आपल्या कटात सामील करून घेतानाचा  कारस्थानी रावण. साळसूदपणे  सीताकुटीशी भीक्षा  मागतानाचा  यतिवेषधारी साधू रावण आणि  जटायुशी त्वेषानी लढतानाचा लढवैय्या रावण.  असे सारे नवरस भाव ह्या दशाननाने   आपल्या एकाच चेहऱ्यावर  झरझर उमटवले आणि उतरवले. ते पाहून थक्क व्हायला झालं. 
 रामायणाच्या कुठल्याही खेळात एकूणच रावण जास्त भाव खाऊन जातो. रावण बिच्चारा  माणूस आहे.  त्याला क्षोभ  आहे, लोभ आहे, माया आहे, असूया आहे. त्याच्या मनात  कपट आहे, पाप आहे,  प्रेम आहे; आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा आहे. असा सर्वगुणदोषसंपन्न  आहे रावण.
त्यामानाने रामाचा रोल अगदीच  सपक. तो सर्वगुणसंपन्न. देवाचाच अवतार तो त्यामुळे सदा समशीतोष्ण. मर्त्यलोकांत रावण आपल्या आसपास दिसायची सोय आहे पण  राम? अं हं!   रामायणाच्या प्रयोगात रामाला विशेष कामच नाही. मोठ्यांच्या उठ सूट पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, लहानांना पाया पडले रे पडले की आशीर्वाद द्यायचे,  सुटायचं एकदा इकडे बघून किंचित हसायचं, एकदा तिकडे बघून यत्किंचित हसायचं आणि  . इकडे रावणाचे हंसी सुद्धा दहा मजली.  त्यामुळेच  रामायणाच्या खेळात एकदा रावण मेला की  खेळातला राम जातो.
पण ह्या खेळातला राम  सुद्धा लक्षात राहिला बरं. त्याच्या  एका वाक्याने तर हशा आणि टाळ्या दोन्ही  वसूल केल्या.
झालं असं की ठरल्याप्रमाणे सुवर्णमृग सीतेला दिसले. त्याने तिला भुलवले.  आता सीतामाईचं  स्वगत चालू झालं.  हे सुवर्णमृग आपल्याला हवंच आहे आणि ह्याची कंचुकी आपल्याला कशी शोभून दिसेल असं तीनं  बोलून दाखवलं. प्रभू रामचंद्र  घरी येताच त्यांना कांचनमृगासाठी कशी कशी गळ  घालायची, कसं त्याना ताबडतोब  मृगयेला पाठवायचं  हे ती मनाशी ठरवते आहे.  इतक्यात राम येतो. पतीदेव घरी आले म्हटल्यानंतर सीता त्याच्या पाया पडते. एकदा राम आशीर्वाद देतो. सीता  दुसऱ्यांदा पाया पडते. राम पुन्हा  आशीर्वाद देतो. सीता पुन्हा पाया पडते! तिसऱ्यांदा पाया पडताच राम आशीर्वाद द्यावा की नाही या विवंचनेत पडतो. प्रेक्षकांना म्हणतो, ‘पतीदेव घरी आल्यानंतर पत्नीने  एकदा नमस्कार करणं हे योग्य, दुसऱ्यांदा करणं हे तर पतीचं  भाग्य, पण तिसऱ्यांदा नमस्कार करणं म्हणजे काहीतरी घोटाळा आहे खास!!!’ वनवासी रामाची ही टिपण्णे गृहस्थाश्रमी  प्रेक्षकांची दाद घेऊन  गेली.