Tuesday, March 24, 2020

गेली कुठे फुले ही?

गेली कुठे फुले ही? 
डॉ. शंतनू अभ्यंकर  

त्या व्हिएतनामच्या ‘मदर’ने आणि एकूणच त्या संग्रहालयाने  भारावून जावून मी तिथल्या संचालकांना भेटायला गेलो. माझ्या मनातला पहिला  प्रश्न मी विचारला, ‘हे इतकं  भयानक संग्रहालय तुम्ही मुलांसाठी का खुलं ठेवलंय?’ 
‘मुलं वहावत जाऊ नयेत, युद्धविरोधी मतं त्यांनी लक्षात घ्यावीत म्हणून.’ ते उत्तरले. वर म्हणाले अहो भारतातले ना तुम्ही?  मग महाभारत हे तर  जगातलं एक आदी युद्धविरोधी महाकाव्य आहे. 

किती खरं होतं त्यांचं म्हणणं; कुरुक्षेत्रावरच्या नरसंहारानंतर, कौरवांचा  वंशविच्छेद होतो, पांडवांच्या पदरी पडतं ते युद्धजर्जर राज्य. पांडवांचेही बहुतेक आप्तस्वकीय मारले जातात. जिंकून घेतलेलं राज्य उपभोगायची उमेद त्यांना रहातच नाही. लवकरच सन्यास घेतात ते.  उत्तर महाभारताच हा शोकात्म शेवट कितीतरी साहित्यकृतींचा विषय आहे. भासाचे ‘ऊरुभंगम्’, विद्याधर पुंडलिकांची ‘चक्र’ (एकांकिका) आणि मतकरींचे ‘आरण्यक’ ही सहज आठवलेली उदाहरणे.     

युद्धबळी डायरेक्ट स्वर्गात जातात असं सर्व संस्कृती  मानतात. ते सहाजीकच आहे. लढायला जावून प्राणांची बाजी लावायला आमिषही तसंच पाहिजे. पण सर्वसंहारक युद्धाचा थेट दाहक अनुभव, महाराष्ट्रभूमीला अलीकडे तरी नाहीच. त्यामुळे की काय  इथे पोवाड्यांचे आणि समरगीतांचे  पीक अमाप. युद्धविरोधी लिखाण शोधूनही सापडणार नाही. 

पण इंग्लंड-अमेरिकेनी जगभर युद्धे केली, त्यातली कित्येक त्यांनी जिंकली आणि कित्येक पार हरली सुद्धा. त्यामुळे युद्धाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. निदान काही  लोकांचा तरी. युद्धविरोध म्हणजे थेट  देशद्रोहच ठरावा  असं राज्यकर्त्यांनाही  बरेचदा वाटतं.  पण जनतेला मात्र नाही. निष्फळ व्हिएतनाम युद्धाविरोधात तर अमेरिकेत  मोठी चळवळ उभी राहिली.  

त्यातूनच युद्धविरोधी साहित्य असा वेगळा प्रकार आणखी फोफावला. यात कथा, कविता यांची रेलचेल आहे. युद्धाची रोमॅंटिक कल्पना उद्ध्वस्त करणारं, हौताम्याभोवतीचं नाहक वलय विझवून टाकणारं, युद्धाचं रखरखीत वास्तव रोखठोकपणे मांडणारं हे साहित्य. अर्थात काही लेखकांना राजकीय पोळी भाजायची होती पण बरेचसे स्वतः पोळले होते, युद्धातील  वैयर्थ त्यांच्या लक्षात आले होते  आणि एकूणच शांततावादी असे त्यांचे विचार त्यांनी जोरकसपणे मांडले. पण युद्धाला पर्याय कुणालाच सुचवता  आलेला नाही. 

मग मला  पीट सीगरचं गाणं आठवलं. (Where have all the flowers gone?) मग तिथेच बसून स्वैर भाषांतर केलं. मनाचा ठाव घेणारं गाणं. एखाद्या लोकगीतांची चाल आणि हृदयस्पर्शी शब्द. संपत संपत गाणं पुन्हा मूळ पदावर येतं आणि जणू एक विचारवर्तुळ पूर्ण होतं. कापुसकोंड्याच्या गोष्टीसारखी युद्ध ही सुद्धा एक न संपणारी गोष्ट आहे, असं तऱ् सुचवत नाही ना  हे गाणं...? 
 
गेली कुठे फुले ही? केंव्हाचा बहरच नाही 
गेली कुठे फुले ही?
तोडली मुलींनी सारी; 
शिकणार कधी मुली या?  कधी या होणार मोठ्या? 

गेल्या कुठे मुली  ह्या? केंव्हाच्या दिसल्या नाही?
गेल्या कुठे मुली  ह्या? 
पोरांनी जवान साऱ्या; साऱ्या करून नेल्या 
शिकतील कधी मुली या?  कधी या होणार मोठ्या? 
शिकतील कधी मुली या?  

दिसेनात कुठेही पोरे? केंव्हाची  गेली  असती...! 
दिसेनात कुठेही पोरे?
तळहाती घेऊन प्राण, गेली सीमेवरी लढाया, नेली सीमेवरी लढाया!
शिकतील कधी मुले ही, होतील कधी ही मोठी? 
शिकतील कधी मुले ही? 

गेले कुठे जवान? केंव्हाचे नाही आले? 
गेले कुठे जवान? 
गेले! दफनही झाले. 
शिकतील कधी मुले ही, होतील कधी ही मोठी? 

दफनभूही दिसेना, केंव्हाचा चालू शोध... 
दफनभूही दिसेना. 
आच्छादली फुलांनी, ही पुढ्यात दफनभूमी 
शिकणार कधी आम्ही? मोठे होणार कधी आम्ही?  
गेली कुठे फुले ही? केंव्हाचा बहरच नाही 
गेली कुठे फुले ही?

Sunday, March 15, 2020

व्हिएतनामची मदर

व्हिएटनामची ‘मदर’ 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

अश्रू म्हटलं की मराठी माणसाला आई आठवते. साने गुरुजींच्या शामच्या आईनं काही पिढ्यांवर गारुड केलं आहे. आई म्हटलं की कसली सोज्वळ आणि भावुक होतात माणसं. पण ‘आई’ नावाच्या शिल्पाने अंतर्बाह्य ढवळून निघल्याचा अनुभव  मला आला तो व्हिएतनाममध्ये. तिथल्या युद्ध-संग्रहालयात.
तब्बल वीस वर्ष चाललेलं हे युद्ध (१९५५-७५). शेवटी इथे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला, पण व्हिएतनामलाही काही कमी भोगावं लागलं नाही. युद्ध हरण्या खालोखाल  काही वाईट असेल, तर ते युद्ध जिंकणे होय. व्हिएतनामला याचा पुरेपूर प्रत्यय आला. 

युद्धाचं  उघडंवाघडं,  भीषण वास्तव, खुलेआम मांडणारं हे युद्ध संग्रहालय. छिन्न चेहरे, विच्छिन्न  शरीरे, छिन्नमनस्क  जनता आणि नापाम बॉम्बने विद्रूप झालेल्या पिढ्याचपिढ्या. ‘एजंट ऑरेंज’ने (एक रासायनिक अस्त्र) उजाड केलेली शेती, वैराण भातखाचरे,  केळीचे सुकलेले बाग, उघडे ताड  आणि बोडके माड. एकेक दालन पार करता करता किती वेळा अंगावर सरसरून काटा येतो. उभ्याउभ्या दरदरून  घाम फुटतो. डोळे गप्पकन्  मिटून आपण जिथल्यातिथे थिजून जातो. हे क्रौर्य आपल्याला  पहावत सुद्धा नाही तर  ज्यांना भोगवं लागलं, त्यांना काय यातना झाल्या असतील; या विचारानी आपण अस्वस्थ होतो.  कोणीही सहृदय माणूस हे संग्रहालय एका झटक्यात पाहुच शकत नाही. थोडा वेळ दालनाबाहेर बसायचं पुन्हा हिम्मत गोल करायची आणि आत  शिरायचं असं करावं लागतं. युद्धस्य फक्त  कथाच  रम्या, वास्तव किती हादरवून सोडणारं असतं ह्याचं यथार्थ दर्शन इथे घडतं.
तिथे  एक ओबडधोबड पुतळा आहे. ‘मदर’ नावाचा.  सात आठ फुट उंचीचा. नाव ‘आई’ असलं तरी मुळात तो बाईचा पुतळा आहे हेही  सांगावं  लागतं. बाईपणाचं आणि आईपणाचं कोणतंच लेणं तिच्या अंगाखांद्यावर नाही. ना आसपास खेळणारी चार दोन गोजिरवाणी पोरं, ना थानाला  लुचलेलं एखादं  पदराआडचं पिल्लू. मुळात तिला थानंच नाहीत. छातीच्या फासळ्याच  तेवढ्या दिसताहेत.  अस्थिपंजर   झालेलं शरीर, त्याला कसलीही गोलाई नाही. तोंड खप्पड, त्यावर ना वात्सल्य, ना प्रेम, ना करूणा,  ना काही. आईपणाशी निगडित कोणतीही भावना नाही त्या चेहऱ्यावर. चेहरा कसला जवळजवळ कवटीच, म्हणायची इतका भेसूर. ही कसली ‘आई’ ही तर बाई सुद्धा नाही. शिवाय ही उभी आहे जमिनीतून निवडुंगासारख्या फुटलेल्या काही पोलादी पट्यांमध्ये. कमळात वगैरे उभी असल्यासारखी. पण हिच्या हातातून मोहरा वगैरे काही पडत नाहीयेत. हिचे हात तर नुसते दोन्ही बाजूला लोंबताहेत, जीव नसल्यासारखे. काही देणं तर सोडाच पण काही मागायचंही त्राण त्यांच्यात नाही. 
ज्ञूएंग होयांग हुय अशा काही तरी नावाच्या कलाकाराची ही कृती. नाव ‘मदर’ दिलंय म्हणून, नाहीतर मम्मी ऐवजी इजिप्त्शियन ‘ममी’ म्हणून खपलं  असतं  हे शिल्प. पण ह्या कलाकृतीची पार्श्वभूमी लक्षात येताच हे शिल्प आपल्याला हादरवून सोडतं. 
युद्धग्रस्त, उद्ध्वस्त, व्हिएतनाममधील ही ‘मदर’ आहे. हीचं  सर्वस्वं  लुटलं गेलं आहे. बेघर, निराधार, निरापत्य अशी ही आई आहे. म्हणजे कधीतरी ती  आई होती. आता तिची मुलं नाहीत. ती बहुधा युद्धात मारली गेली. आता हिला घर नाही ते बहुधा युद्धात ध्वस्त झालं. आता हिला शेतीवाडी नाही, म्हणजे असेलही जमिनीचा तुकडा, पण नापाम बॉम्बच्या रासायनिक माऱ्यात तिथलं पीक झालंय निष्प्राण  आणि जमीन आता कायमची नापीक. 
हे आर्त साकार करण्यासाठी मग कलाकाराने बॉम्बच्याच कपच्या वापरल्या आहेत. ह्या कपच्यांच्याच  कमळ-पसाऱ्यात ती उभी आहे, ह्या कपच्यांनीच ती बनली आहे. ज्यामुळे ती उद्ध्वस्त झाली त्या बॉम्बच्या तुकड्या तुकड्यांनीच ती आता घडली आहे. आपल्या रयाहीन, पोकळ, वठल्या शरीरातून पहाणाऱ्याचा अंत पहाते  आहे.

Sunday, March 8, 2020

मोक्षमार्ग

मोक्षमार्ग 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

मोक्षप्राप्तीचे सुख तसेे अनेक ठिकाणी लपलेले असते. 
निसर्गात तर हे सुख वारंवार. उत्तुंग शिखराच्या पायथ्याशी येणारे इवलेपण, अथांग सागराच्या किनाऱ्याशी उरी जागणारी गूढ जिज्ञासा, आकाशगंगेच्या दर्शनमात्रे फुलणारी गात्रे, असे सारे क्षण विलक्षण खरेच. तो तो क्षण  मनात कायमचा  कोरलेला. नुसत्या आठवानेही थरारून टाकणारा.  कोणत्याही अननुभूत सौंदर्याचा अनुभव हा मोक्षपदी  पोहोचवणाराच असतो. मोक्षाचे मार्ग अनेक.
पण निव्वळ सौंदर्याच्या भव्योत्कट     दर्शनाने,  नकळत, अलिप्तता उन्मळून पडावी आणि अनावर आनंदाअश्रूंचे  झरे फुटावेत असं खूप खूप क्वचित होतं. असा एक क्षण मला गवसला दार्जिलिंगला. तिथला  सूर्योदय हा एक खास सौंदर्यानुभव. 
इथे पश्चिमेकडे तोंड करून सूर्योदय बघायचा असतो. म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतो पण आपण बघत रहायचं पश्चिमेला. कारण पश्चिम क्षितिजावरच्या पर्वतराजीतील कांचनगंगेचे शिखर सूर्योदय होताच सर्वप्रथम दीप्तिमान होते. आणि ते दृश्य अद्भुत असते. 
पहाटे चारलाच उठावं  लागतं. सुरवातीला मिट्ट  काळोख असतो. काहीच दिसत नाही. आणि तो  क्षण येतो.  भुरकट, धुरकट क्षितिजाच्या झिरझिरीत, अस्पष्ट, पडद्याआड ठिणगी पडावी आणि विझूच  नये असा एक प्रकाशबिंदु अचानक लकाकतो आणि आपल्या काळजाची तार छेडून जातो. पूर्वक्षितिजावर तेजोनिधीच्या पावलाची ही पहिली पश्चिमचाहूल. हे किरण कांचनगंगेच्या शिखराला स्पर्श करतात, तो  क्षण अविस्मरणीय. दुसऱ्याच क्षणी तो ठिपका विस्तारतो, जणू विजेचा लोळ होतो  आणि  त्या हिमपर्वताच्या कडांवर  गडद केशरी निऑनच्या झगमगत्या नळयांची आरास उमटते. हा  तेज:पुंज  दिव्य क्षण आपण अनुभवेपर्यंत  तो प्रकाश लखलखत्या रेशीमधारा होऊन शिखरावरुन  खाली ओघळू लागतो आणि  कांचनगंगेच्या कडेकपाऱ्या  आपल्या परिसस्पर्शाने झळाळून टाकतो. हळूहळू मलमली पडद्याआड आसपासची शिखरे  उजळू लागतात. तीही  क्षणभर ही प्रकाशशलाका  अंगाखांद्यावर खेळवतात आणि पुढच्याच क्षणी त्या स्वर्गीय प्रकाशात न्हाऊन निघतात. सुर्वणरसाचा अभिषेक करावा तसा  हा  प्रकाशाचा लाव्हा वहात वहात जातो. आपण शहारून जातो ते निव्वळ थंडीने नाही. 
इतक्यात आपल्यापासून ते त्या शिखरांपर्यंत  गुबगुबीत गालिचा अंथरलेला असावा तसे ढगांचे पुंजके दृष्यमान होतात. असं वाटतं की या पायघड्यांवरुन  गेलो तर  त्या  शिखराशी सहज पोहोचू आपण. क्षणात गुलाबी तर  क्षणात सोनेरी प्रभा त्या ढगात खेळू लागते. विजेच्या वेगाने समोरचे रंग बदलत रहातात. आपण दंग होऊन जातो. ते ढग खूप खूप  खाली, खोल दरीत  असतात आणि आपण असतो आकाशाच्या कुशीत. 
वर नजर जाताच मघाशी सुवर्णरसानी ओथंबलेली शिखरे आता स्वच्छ उन्हात, शुभ्र चांदीची चमचम ल्यालेली दिसतात. हिमालयाचा हेमालय आणि हेमालयाचा रजताद्री असा नजरबंदीचा हा खेळ.
उन्हे वर येतात. अचानक एक कोवळी तिरीप आपल्या अंगाला स्पर्श करते. हा तमसो मा ज्योतिर्गमयी   खेळ  याची डोळा बघितल्याची लोभस जाणीव, याची देही करून देतात. त्या उन्हात उजळलेल्या धुक्याच्या कणांत आपल्याला आपणच दिसायला लागतो. पृथ्वी नावाच्या ह्या वेटोळ्या गोळ्याच्या काठावर असा खेळ अव्याहत चालू असणारा. आणि ह्यापेक्षाही कित्येक पट असे कोट्यवधी सूर्य, त्यांचे त्याहून अधिक  ग्रहगोलक. त्यांची उत्पत्ती, स्थिति, गती आणि लय निर्हेतुकपणे चालूच. पण या साऱ्यात आनंद शोधणारं, साऱ्यात हेतू शोधणारं मानवी मन.     ब्रम्हांडसोहोळ्याची ही सारी  लीला मला असह्य  होते. कोणती पुण्ये अशी आली फळाला, असा प्रश्न पडतो.
एवढे सुख सहन करणं माझ्या शक्तीपलीकडे असतं. नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे नेमके आनंदाश्रू की आणखी काही हे सांगता येत नाही. मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच असावा बहुतेक.

Saturday, February 22, 2020

५ शेंड्यांचं दुकान बंद झालं


शेंड्यांच दुकान बंद झालं!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

ते असो, मी काय सांगत होतो, संस्कृती प्रवाही असते... ह्या प्रवाहात झाडे तर जातातच पण लव्हाळीही रहातील की नाही सांगता येत नाही. आता हेच बघा ना...  
‘शेंड्यांच दुकान बंद झालं!’
‘म्हणजे?’
‘म्हणजे कायमचं बंद झालं.’
‘शेंडे रिटायर झालेत!’
‘ऑ!’
‘त्यांना काय झालं रिटायर व्हायला?’
‘झालं काही नाही, फक्त वय झालं.’
‘च्यामारी, आता आम्ही चौकात चहासाठी कुणाकडे जायचं?...आणि दुकानाची भाड्याची  जागा?’
‘ती कृष्णाबाई संस्थानची होती. शेंड्यांनी ती कुठलीही अपेक्षा न करता परत केली!!’
‘ऑ!!’
हे संवाद सध्या वाईत घरोघरी झडत आहेत.
सतीश शेंड्यांचं हे चहाचं, म्हणजे चहाची पावडर मिळण्याचं दुकान. पण मालकांचं अगत्य एवढं की शेजारच्या चहा-टपरीवाल्याची सतत भरभराट होत गेली!
शेंड्यांचं दुकान गेली कित्येक वर्ष चौकात ठाण मांडून आहे. चहाचं म्हणून सुरु झालेलं दुकान, मग त्याचं विस्तारित रूप, मग आगीत भस्मीभूत झालेलं दुकान, मग त्याच फिनिक्ससारखं राखेतून नव्या रुपात उभे रहाणं हे सगळ तमाम वाईकरांच्या परिचयाचं आहे. हे परिचयाचं आहे तसंच सतीश शेंड्यांची काउंटरपलीकडून येणारी दणदणीत हाळीही परिचयाची आहे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला अगत्यानी दुकानात बोलावणार, चार इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार; त्याच वेळी आलेल्या गिऱ्हाइकाला हवं-नको पहाणे, नोकर माणसांना सतत सूचना देणे, पैसे देणे-घेणे, मालाची यादी बनवणे अशी एका वेळी दहा हात असल्यागत शेंड्यांची कामे चालू असणार. मग, ‘चला येतो आता.’ असं म्हटलं की शेंडे  म्हणणार, ‘थांब रे, चहा सांगितलाय. आत्ता येईल.’
गप्पांच्या ओघात खाणाखुणा करून शेंड्यांनी पलीकडच्या च्यावाल्याला केंव्हाच चहाची ऑर्डर दिलेली असायची. मग खास टपरीवरचा तो च्या, घोटा दोन घोटात संपवून आपण बाहेर पडायचं. पण पाउल बाहेर पडतापडता शेंडे पुन्हा हाक मारणार आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेला  कागदाचा पाठकोरा चतकोर समोर धरणार. मघाशी जी मालाची यादी म्हणून आपण समजलो ती मालाची यादी नसून, ती असणार पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीची चेकलिस्ट!!!
ही शेंड्यांची खासियत. प्लॅनिंग जबरदस्त. प्रत्येक गोष्टीची यादी. कार्यक्रम कोणताही असो. मंत्र्यासंत्र्यांच्या उपस्थितीतील एखादा बडा समारंभ असो वा चार टाळकी तरी जमतील की नाही अशी शंका असणारा, छोटेखानी कथाकथनाचा असो, याद्या तयार. मित्र म्हणणार, नारळ प्रमुख पाहुण्यांच्या हातात कोण देणार...आणि तो देणाऱ्याच्या हातात तो कोण देणार.. इथपर्यंत याद्या! पण शेंडे अशा चेष्टेने डगमगत नाहीत. आपला वसा टाकत नाहीत.
शेंडे दुकानात बसून गावच्या संस्कृतीची काळजी वहाणार. प्रतिक थिएटर   आणि संस्कार भारतीसाठी  हजार उठाठेवी करणार.  दुकानाबाहेर चक्क एक स्मृतीस्तंभ घडलेला. दिनविशेषानुसार त्यावर थोरामोठ्यांची प्रतिमा ठेवलेली. मग कधी प्रतिमापूजन वगैरे असा खास कार्यक्रम. शेंड्यांच्या दुकानात निव्वळ खरेदीला फारच थोडे लोक जाणार. बहुतेक जाणार ते सांस्कृतिक समृद्धीसाठी. म्हणूनच दुकान बंद म्हटलं की रुखरुख वाटू लागते.
शेंडे भेटले की विचारणार आहे मी आता, ‘अहो आता आम्ही चहाला कुठ जायचं?’ पण त्यांचं उत्तर मला आत्त्ताच ठाऊक आहे, ‘म्हणजे? आता चहाला घरी यायचं!’
...आणि अगदी अस्सच झालं, मी सवाल करताच त्यांचा जवाब आला, ‘म्हणजे? आता चहाला घरी यायचं! त्या निमित्तानी तू घरी येशील आणि चहा बरोबर पोहेही खाशील!!’



७ चहा आणि चहाते


चहा आणि  चहाते
डॉ. शंतनू अभ्यंकर

शिवाय चाहत्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, ‘पेशल’ चहा, इराण्याचा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार.  शुद्ध दुधाचा चहा आहे, बिनदुधाचा चहा आहे, साखरेचा आहे, बिन साखरेचा आहे, गुळाचा आहे. कसले कसले मसाले घातलेला चहा आहे  इतकंच काय  मुळात दुसरीच  कुठली तरी  ‘कीस झाड की पत्ती’  घातलेला, असा बिनचहापत्तीचाही  चहा आहे.   गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे.  खारट, आंबट, तिखट, तुरट  अशा अनवट चवीचा आहे.  करपलेला, धुरकटलेला अशा नकोशा वासाचा आहे. खळखळ उकळता चहा  पिणारे आहेत.  ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत  ‘गार झाला’ म्हणणारे आहेत. ‘आता तोंडात गाळू का?’ विचारणारे आहेत आणि बर्फीला, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी  आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे.
बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे, किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला ‘च्या’ आहे, रेल्वेतला ‘च्याय ग्रेम’ आहे, नेमकं या द्रावणात आहे तरी काय अशा बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित ‘टी’ आहे आणि  या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे.    
अमृततुल्य चहा ही  मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये  नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे.    स्वर्गातही सध्या 'चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती  शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि  बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे  असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार" वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात तरंगत तेवणारी ज्योत,  हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिर्हाइकांसाठी 'प्रभात' आणि 'संध्यानंद' घेणंही यांना कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ  कर्तव्यभावनेनं घेतो. इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता तो चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं  घालतो ते  पहा. त्याच्या  हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं  पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे, जादूगाराची  छडी फिरावी तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते कशाय पेय सिद्ध होणार आहे.  इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स. अशा चहाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच  नाही.
 काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काहीनाकाही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण  वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यालाही उसंत नसावी, नाष्टा,  जेवणाचे मुळी  भानच नसावे. मग कधीतरी उतरत्या संध्याकाळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी.   अशावेळी झक्कपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा  घेऊन बसावे. चार बिस्किटे एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. डोळे मिटावेत.  जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद  दाबावा. मोक्ष मिळेल.


६ चहा


चहा
डॉ. शंतनू अभ्यंकर

चहा पोहे वरुन आठवलं, आमच्या एका मित्राकडे येणाऱ्याजाणाऱ्यांचं स्वागत करण्याची त्रीसूत्री होती,
पहिल्यांदा आलात तर पोहे आणि चहा,
दुसऱ्यांदा आलात तर नुसताच चहा
आणि तिसऱ्यांदा आलात तर फक्त  अहा!!                                                 
                                             
अर्थात हा प्रकार मला मात्र आवडत नाही. आल्यागेल्याला निव्वळ चहासुद्धा देण्याची माणुसकी असू नये म्हणजे फार झालं.
कल्पना करा, तुम्ही या मित्राकडे   चालला आहात. चांगली टळटळीत दुपार आहे. घड्याळात चहा वाजले आहेत. याच्याकडे होईलच या भरवशावर, तुम्ही घराचा चहा धुडकावून लावता आणि हा तुम्हाला नुसतंच 'अहा' म्हणून  कटवतो!! कसं वाटतं? चहा आणि अहा यमक जुळत असलं तरी चहाची जागा काही अहा घेऊ शकत नाही. चहा तो चहाच !
  आणि फक्त तोच चहा, की जो साग्रसंगीत तयार केला जातो आणि तितकाच तन्मयतेने प्यायला जातो. अशी रससिद्धी साधून जाणे हे साधं काम नाही. यासाठी आधी पाण्याला उकळी आली पाहिजे. नंतर साखर टाकली पाहिजे. साखरही कशी? वर कणभर जरी टाकली तरी जास्त होईल अशी. त्याच वेळी दुसऱ्या शेगडीवर दूध तापत असलं पाहिजे. चहा उकळल्यावर नंतर  दूध तापवलं तर दूध तापेपर्यत चहा गार होतो. साखर विरघळली की मगच  चहापावडर टाकायची. त्या फेसाळत्या पाण्यात त्या चहाचा अर्क छानपैकी उतरतो. तात्काळ गॅस बंद करून चहावर झाकण ठेऊन तो मुरू द्यावा. लोणचं मुरतं तसा चहा सुद्धा मुरतो बरं. आणि अट्टल चहाबाजांना चहा मुरला किंवा  नाही हे लगेच कळते. असो. आता दूध तापलं असेल. आता चहा गाळावा आणि त्यात दूधही गाळून घालावे. चहात साय घालणं हा फौजदारी गुन्हा ठरवला पाहिजे. चहा म्हणजे लस्सी नाही. सायीमुळे चहाची सगळी रयाच जाते. साय  नावाचा तो गिळगिळीत पदार्थ घुटक्या सरशी गिळणारी मंडळी पहिली की पट्टीच्या चहाबाजांच्या अंगावर शहारा येतो.  असो. तर अशा   रीतीने सिद्ध झालेला चहा आता गार होण्याच्या आत घुटके घेत घेत  संपवायचा आहे.
चहाचा वास वातावरणात दरवळ्यापासूनच खरंतर तुम्ही चहा प्यायला सुरुवात करता. मग कपबशांचा मंजूळ किणकीणाट कानी येतो आणि तो वाफाळता कप किंवा गिलास कलीजा  खलास करून जातो.   चहा समोर आल्यावर तुम्ही आधी नजरेने चहा पिता आणि मग जिभेनं. पहिल्याच घोटात ओठ आणि जीभ किंचित पोळायला हवी ! चहा बशीत ओतून, फुंकून, फुंकून, फुंकून गार करून पिणं म्हणजे सोळाव्या वर्षी लग्न करून शहाण्णवाव्या वर्षी संभोग करण्यासारखं आहे! चहा गरम नाही प्यायचा म्हणजे काय? म्हणे तोंड भाजतं म्हणे.  भाजलं तर भाजू देत. काही वेदना या सुखकर असतात हे या वया तरी   तुमच्या लक्षात यायला पाहिजे.
एकदा चहाचे तुम्ही रसिक चाहते बनलात की  मग तुम्हाला, 'घाईचा  चहा लागणं' म्हणजे काय हे कळेल, आणि नुसतंच "अहा" वर कटवणाऱ्या मित्राबद्दल मला एवढा राग का तेही कळेल.
बाकी या चहाची खुमारी काही औरच आहे. अगदी तस्साच केलेला चहा स्थलकालप्रसंगानुरूप वेगवेगळा लागतो हे मी अनुभवलं  आहे. सकाळच्या पहिल्या चहाबरोबर वर्तमानपत्राच्या कागदाचा वास हवा. शिवाय रविवार असेल तर चांगली जाडजूड पुरवणी हवी. या शिवाय त्या चहाला पूर्तता नाही. संध्याकाळच्या चहाआधी चांगली लांबलचक जबडाफाड जांभई हवी आणि आळोखेपिळोखे देत संपूर्ण शरीरावर्तनी आळस हवा.  पावसाळ्यात जर तुम्ही चहा पिणार असाल तर पाऊस धुवांधार बरसत असताना प्या. उगाच नळ गाळावा तसा पाऊस गळत असेल तर ती चहाची वेळच नाही.  धुवांधार पावसाबरोबर थंडी आणि धुकं असेल तर मग चहा प्यायल्यावर आभाळ ठेंगणं होत. थंडीतही चहाची खास वेळ आहे. हात पाय चांगले गार पडले, की  मग चहाकडे वळावं चहाच्याच कपानं  हात शेकत शेकत चहा प्यावा. थंडीत चहा कपानं पिता चांगले मोठे मग घ्यावेत. उन्हाळ्यात मात्र चहा थोडा थोडा आणि बऱ्याचदा प्यावा. अगदी बोळक्यानं किंवा बोंडल्यानं चहा प्यायलाही हरकत नाही. अर्थात पट्टीचे चहाबाज असतात त्यांना चहा कोणत्याही वेळी वर्ज्य नसतो. फक्त काही वेळा तो अधिक प्रिय असतो एवढंच.
(क्रमच: सॉरी क्रमशः)