Saturday, February 22, 2020

५ शेंड्यांचं दुकान बंद झालं


शेंड्यांच दुकान बंद झालं!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

ते असो, मी काय सांगत होतो, संस्कृती प्रवाही असते... ह्या प्रवाहात झाडे तर जातातच पण लव्हाळीही रहातील की नाही सांगता येत नाही. आता हेच बघा ना...  
‘शेंड्यांच दुकान बंद झालं!’
‘म्हणजे?’
‘म्हणजे कायमचं बंद झालं.’
‘शेंडे रिटायर झालेत!’
‘ऑ!’
‘त्यांना काय झालं रिटायर व्हायला?’
‘झालं काही नाही, फक्त वय झालं.’
‘च्यामारी, आता आम्ही चौकात चहासाठी कुणाकडे जायचं?...आणि दुकानाची भाड्याची  जागा?’
‘ती कृष्णाबाई संस्थानची होती. शेंड्यांनी ती कुठलीही अपेक्षा न करता परत केली!!’
‘ऑ!!’
हे संवाद सध्या वाईत घरोघरी झडत आहेत.
सतीश शेंड्यांचं हे चहाचं, म्हणजे चहाची पावडर मिळण्याचं दुकान. पण मालकांचं अगत्य एवढं की शेजारच्या चहा-टपरीवाल्याची सतत भरभराट होत गेली!
शेंड्यांचं दुकान गेली कित्येक वर्ष चौकात ठाण मांडून आहे. चहाचं म्हणून सुरु झालेलं दुकान, मग त्याचं विस्तारित रूप, मग आगीत भस्मीभूत झालेलं दुकान, मग त्याच फिनिक्ससारखं राखेतून नव्या रुपात उभे रहाणं हे सगळ तमाम वाईकरांच्या परिचयाचं आहे. हे परिचयाचं आहे तसंच सतीश शेंड्यांची काउंटरपलीकडून येणारी दणदणीत हाळीही परिचयाची आहे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला अगत्यानी दुकानात बोलावणार, चार इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार; त्याच वेळी आलेल्या गिऱ्हाइकाला हवं-नको पहाणे, नोकर माणसांना सतत सूचना देणे, पैसे देणे-घेणे, मालाची यादी बनवणे अशी एका वेळी दहा हात असल्यागत शेंड्यांची कामे चालू असणार. मग, ‘चला येतो आता.’ असं म्हटलं की शेंडे  म्हणणार, ‘थांब रे, चहा सांगितलाय. आत्ता येईल.’
गप्पांच्या ओघात खाणाखुणा करून शेंड्यांनी पलीकडच्या च्यावाल्याला केंव्हाच चहाची ऑर्डर दिलेली असायची. मग खास टपरीवरचा तो च्या, घोटा दोन घोटात संपवून आपण बाहेर पडायचं. पण पाउल बाहेर पडतापडता शेंडे पुन्हा हाक मारणार आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेला  कागदाचा पाठकोरा चतकोर समोर धरणार. मघाशी जी मालाची यादी म्हणून आपण समजलो ती मालाची यादी नसून, ती असणार पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीची चेकलिस्ट!!!
ही शेंड्यांची खासियत. प्लॅनिंग जबरदस्त. प्रत्येक गोष्टीची यादी. कार्यक्रम कोणताही असो. मंत्र्यासंत्र्यांच्या उपस्थितीतील एखादा बडा समारंभ असो वा चार टाळकी तरी जमतील की नाही अशी शंका असणारा, छोटेखानी कथाकथनाचा असो, याद्या तयार. मित्र म्हणणार, नारळ प्रमुख पाहुण्यांच्या हातात कोण देणार...आणि तो देणाऱ्याच्या हातात तो कोण देणार.. इथपर्यंत याद्या! पण शेंडे अशा चेष्टेने डगमगत नाहीत. आपला वसा टाकत नाहीत.
शेंडे दुकानात बसून गावच्या संस्कृतीची काळजी वहाणार. प्रतिक थिएटर   आणि संस्कार भारतीसाठी  हजार उठाठेवी करणार.  दुकानाबाहेर चक्क एक स्मृतीस्तंभ घडलेला. दिनविशेषानुसार त्यावर थोरामोठ्यांची प्रतिमा ठेवलेली. मग कधी प्रतिमापूजन वगैरे असा खास कार्यक्रम. शेंड्यांच्या दुकानात निव्वळ खरेदीला फारच थोडे लोक जाणार. बहुतेक जाणार ते सांस्कृतिक समृद्धीसाठी. म्हणूनच दुकान बंद म्हटलं की रुखरुख वाटू लागते.
शेंडे भेटले की विचारणार आहे मी आता, ‘अहो आता आम्ही चहाला कुठ जायचं?’ पण त्यांचं उत्तर मला आत्त्ताच ठाऊक आहे, ‘म्हणजे? आता चहाला घरी यायचं!’
...आणि अगदी अस्सच झालं, मी सवाल करताच त्यांचा जवाब आला, ‘म्हणजे? आता चहाला घरी यायचं! त्या निमित्तानी तू घरी येशील आणि चहा बरोबर पोहेही खाशील!!’



No comments:

Post a Comment